ताज़ा खबरे
Home / पुणे / कारागृह विभागाने थकविले एसटीचे दोन कोटी

कारागृह विभागाने थकविले एसटीचे दोन कोटी

पुणे : तोटा सहन करीत अखंडपणे सेवा देणाऱ्या राज्य मार्ग परिवहन मंडळाचे (एसटी) राज्य कारागृह विभागाकडे तब्बल दोन कोटी २१ लाख रुपये थकल्याचे समोर आले आहे. त्यामधील १९ लाख ९७ हजार रुपये रक्कम एसटी महामंडळाला नुकतीच मंजूर करण्यात आली आहे. तरीही अद्याप एसटी महामंडळाची कारागृह विभागाकडे दोन कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे समोर आले आहे.
राज्यात एसटी महामंडळाकडून हजारो कोटी रुपयांचा तोटा सहन प्रवाशांना कानाकोपऱ्यात सेवा दिली जात आहे. प्रवाशांप्रमाणे शासनाचे पोलिस, कारागृह, राज्य राखीव पोलिस दल असे अनेक विभाग एसटी महामंडळाची सेवा घेतात. मात्र, त्यांच्याकडून एसटी महामंडळाला बिलाचा भरणा वेळेवर केला जात नाही. त्यामुळे एसटी महामंडळाची सरकारी विभागाकडे दोन हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त थकबाकी आहे. पोलिस विभागाकडून बंदोबस्तासाठी कर्मचाऱ्यांची ने-आण, प्रशिक्षणार्थी पोलिसांना केंद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या बसगाड्यांचा वापर केला. तसेच, बंदोबस्ताच्या वेळी पोलिसांना वेगवेगळ्या ठिकाणी जाण्यासाठी बसगाड्यांचा वापर करण्यात येतो. त्यासाठी एसटी महामंडळाकडून पोलिसांना भाडे आकारले जाते. पण, हे भाडे त्यांना वेळेवर कधीच मिळत नाही.
राज्यात पोलिसांप्रमाणेच कारागृह विभागाकडून देखील एसटी महामंडळाच्या बसेसचा वापर केला जातो. कारागृहाचे कर्मचारी कर्तव्यासाठी एसटी बसचा वापर करतात. तसेच, दूर अंतरावर कैद्यांना घेऊन जाण्यासाठी देखील बसचा वापर केला जातो. गेल्या काही वर्षात एसटी महामंडळाची सेवा घेतल्यामुळे त्यांचे कारागृह विभागाकडे तब्बल दोन कोटी २१ लाख ४५ हजार रुपये थकले आहेत. यामध्ये प्रवास खर्चाची रक्कम आणि गेल्या काही वर्षांचे व्याज याचा समावेश आहे. या थकित रकमेची माहिती खुद्द तुरुंग विभागाच्या प्रमुख भूषणकुमार उपाध्याय यांनी शासनाला कळविली आहे. त्यामुळे सरकारने या रकमेपैकी १९ लाख ९७ हजार रुपये एसटी महामंडळाला देण्यास मंजुरी दिली आहे. ही रक्कम एसटी महामंडळाला दिली, तरीही त्यांचे कारागृह विभागाकडे अद्याप दोन कोटी रुपयांची थकबाकी शिल्लक आहे. कारागृह विभाग वेगवेगळे उद्योग व शेतीच्या माध्यमातून शासनाला प्रत्येक वर्षी कोट्यवधी रुपये मिळवून देतो. त्या रकमेपैकी रक्कम एसटी महामंडळ व कारागृहाला सुधारणेसाठी देण्याची आवश्यकता आहे.

Check Also

पुणे में सीबीआई ने मणिपुर हत्याकांड के मास्टरमाइंड को दबोचा

पुणे- मणिपुर में पिछले कुछ महीनों से हिंसा जारी है। दो बच्चों का अपहरण कर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *