ताज़ा खबरे
Home / पुणे / छायाचित्रकारांना एकत्र आणणा-या पिक्सलेन्ट या संकेतस्थळाची सुरुवात

छायाचित्रकारांना एकत्र आणणा-या पिक्सलेन्ट या संकेतस्थळाची सुरुवात

पुणे : जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून छायाचित्रण छंद म्हणून जोपासलेल्या अथवा व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी पिक्सलेन्ट या भारतातील पहिल्या संकेतस्थळाची सुरुवात पुण्यात करण्यात आली. या संकेतस्थळामुळे छायाचित्रण कलेमध्ये जास्तीत जास्त आकर्षकता आणि सफाई आणण्याबरोबरच प्रख्यात छायाचित्रकारांकडून या विषयी मार्गदर्शन मिळवण्याची संधी सहज शक्य झाली आहे.

पुण्यातील डॉ. यशोधन जोशी यांच्या संकल्पनेतून pixlent.com या संकेतस्थळाची निर्मिती झाली असून वारी हॉस्पिटॅलिटीतर्फे जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सुमंत मुळगांवकर सभागृहात या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. ‘लँडस्केप’ छायाचित्रणातील तज्ज्ञ ललित देशमुख यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संकेतस्थळावर मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सुप्रसिद्ध छायाचित्रकार ललित देशमुख, समीर बेलवलकर, रितेश रमैय्या, विनोद बारटक्के, सुशील चिकणे, सागर गोसावी, सतीश पाकणीकर, रॉबिन सैनी आणि विक्रम पोतदार हे उपस्थित होते.

डॉ. यशोधन जोशी संकेतस्थळाविषयी माहिती देताना म्हणाले की, www.pixlent.com या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर फोटोग्राफरने काढलेले पाच फोटो त्याला या वेबसाईटवर ‘अपलोड’ करता येतील. ‘अपलोड’ करण्यात आलेल्या फोटोच्या अनुषंगाने तज्ज्ञ छायाचित्रकार त्या फोटोमधील त्रुटी, चांगल्या गोष्टी, काय सुधारणा करता येतील आणि इतर गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन फोटोग्राफरला करतील. ‘रिव्ह्यू’ करण्यासाठी फोटो पाठविणा-या फोटोग्राफर्सचे तीन गट करण्यात आले आहेत. ‘बेसिक’, ‘अॅडव्हान्स्ड’ आणि ‘एक्स्पर्ट’ अशा तीन गटानुसार फोटोग्राफर्सची विभागणी करण्यात येईल आणि त्यांच्या फोटोची चर्चा केली जाईल. तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत पूर्णतः गुप्त राखण्यात येणार असून फक्त छायाचित्र अपलोड करणा-या व्यक्तिसच ते दिसू शकेल. तांत्रिकदृष्ट्या उत्तम फोटोंना ‘बेस्टी’ विभागात स्थान मिळेल जे या संकेतस्थळाला भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीस दिसू शकेल.

पिक्सलेन्टवर नियुक्त करण्यात आलेल्या छायाचित्रकारांबरोबर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. प्रशांत देसाई यांनी उत्तम छायाचित्र कसे मिळवावे आणि छायाचित्रास उत्तमरित्या सादर कसे करावे या विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधला. पिक्सलेन्टचे सल्लागार ललित देशमुख आणि फॅशन फोटोग्राफर समीर बेलवलकर यांनी पिक्सलेन्ट संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या काही छायाचित्रांचे परीक्षण करून त्यातल्या त्रुटी काय आहेत यावर अभिप्राय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री धारणे यांनी केले. समीर बेलवलकर यांनी आभार मानले.

Check Also

पुणे में सीबीआई ने मणिपुर हत्याकांड के मास्टरमाइंड को दबोचा

पुणे- मणिपुर में पिछले कुछ महीनों से हिंसा जारी है। दो बच्चों का अपहरण कर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *