ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / लष्कराकडून बोपखेल उड्डाणपुलाला जागा देण्याची कार्यवाही; आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश

लष्कराकडून बोपखेल उड्डाणपुलाला जागा देण्याची कार्यवाही; आमदार जगतापांच्या पाठपुराव्याला यश

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलगावचा रस्त्याचा गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असलेला प्रश्न लवकरच सुटण्याची आशा निर्माण झाली आहे. लष्कराकडून जागा मिळत नसल्याने बोपखेल ते खडकी दरम्यान मुळा नदीवरील प्रस्तावित उड्डाणपुलाचे काम कागदावर राहिले होते. परंतु, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी वारंवार दिल्ली दरबारी जाऊन उड्डाणपुलाला लष्कराची जागा मिळवण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. लष्कराने उड्डाणपुलासाठी आवश्यक जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ताब्यात देण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू केली आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे.

बापखेलमधून दापोडी आणि खडकीला जाण्यासाठी सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा वापर केला जात होता. त्यामुळे बोपखेलमधील ग्रामस्थांना पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाणे सोईचे ठरत होते. मात्र उच्च न्यायालयाने एका याचिकेवर दिलेल्या निकालानंतर लष्कराने २०१५ मध्ये सीएमईच्या हद्दीतील रस्ता बंद केला. हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, यासाठी बोपखेलकरांनी आतापर्यंत अनेक आंदोलने केली. त्याला लष्कराने कोणतीही दाद न देता सीएमईच्या हद्दीतून जाणारा रस्ता कायमचाच बंद करून टाकला. तसेच बोपखेलवासीयांची गैरसोय दूर करण्यासाठी मुळा नदीवर बोपखेल ते खडकीला जोडणारा तात्पुरता तरंगता पूल सुरू केला.

मात्र, हा तात्पुरता तरंगता पूल तात्पुरताच ठरला. त्यामुळे बोपखेलवासीयांना सध्या पुणे आणि पिंपरी-चिंचवडला जाण्यासाठी दहा ते पंधरा किलोमीटरचा वेढा पडत आहे. बोपखेलमधून पुढे खडकीत ५१२ येथे निघणारा पर्यायी रस्ता कायमस्वरूपी करण्यासाठी मुळा नदीवर उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात खर्चाची तरतूदही करण्यात आली. मात्र खडकीच्या दारूगोळा कारखान्याच्या आसपास निघणाऱ्या या रस्त्यासाठी लष्कराचे ना-हरकत प्रमाणपत्र व उड्डाणपुलासाठी जागा मिळत नसल्याने बोपखेल आणि खडकी दरम्यानचा प्रस्तावित उड्डाणपूल आजतागायत कागदावरच राहिला आहे.

भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी यांनी उड्डाणपूल व रस्त्यासाठी लष्कराने ना-हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक जागा द्यावी, यासाठी अनेकदा दिल्ली दरबारी जाऊन प्रयत्न केले. तत्कालिन संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, अरूण जेटली आणि विद्यमान संरक्षणमंत्री निर्मला सितारमन तसेच केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा केला. त्याला अखेर यश आले आहे. लष्कराने बोपखेल आणि खडकी दरम्यान उड्डाणपूल उभारण्यासाठी आवश्यक जागा देण्याची तयारी दर्शवली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला आवश्यक जागा हस्तांतर करण्याची प्रशासकीय कार्यवाही सुरू करण्यात आल्याचे संरक्षण मंत्रालयाने आमदार जगताप यांना पत्राद्वारे कळविले आहे. त्याबाबत संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव मनीष ठाकूर यांनी हे पत्र पाठविले आहे. त्यामुळे बोपखेल आणि खडकीला जोडणारा उड्डाणपूल उभारण्याचा लष्कराचा अडथळा लवकरच दूर होणार आहे.

यासंदर्भात आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “लष्कराचे कायदे व नियम कडक असल्यामुळे बोपखेल व खडकीला जोडण्यासाठी उभारण्यात येणाऱ्या प्रस्तावित उड्डाणपुलाला उशीर झाला आहे. मात्र वारंवार केलेल्या पाठपुराव्यानंतर या उड्डाणपुलाला लष्कराची आवश्यक जागा देण्याची कार्यवाही संरक्षण मंत्रालयाने सुरू केली आहे. लष्कराकडून लवकरात लवकर जागा ताब्यात घेण्याचा प्रयत्न आहे. त्यानंतर महापालिकेच्या वतीने जलदगतीने उड्डाणपूल उभारण्याचे काम केले जाईल. बोपखेलकरांनी आतापर्यंत खूप त्रास सोसला आहे. त्यापासून कायमची सुटका करण्याचा आमचा प्रयत्न असेल.”

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *