ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / शेतकरी आत्महत्याचे विदारक दृष्य कलाकार साकारायला गेला अन्‌…

शेतकरी आत्महत्याचे विदारक दृष्य कलाकार साकारायला गेला अन्‌…

  • शेतकरी आत्महत्येचा सीन करताना फास लागला!

नागपूर। (PNE)- निसर्ग आणि व्यवस्थेच्या जाळ्यात अडकलेला शेतकरी गळफास घेऊन आपले जीवन संपवीत आहे. याच शेतकऱ्यांच्या प्रश्नांची धग मांडण्यासाठी रामटेकच्या वैकुंठ चतुर्दशीनिमित्त काढण्यात आलेल्या शोभायात्रेत शेतकरी आत्महत्येचा देखावा साकारण्यात आला. गळ्यात फास लावून कलाकार ट्रॅक्टरमध्ये बसला. गांधी चौकातून यात्रा जात असतानाच अचानक धक्का बसला आणि गळफास लागून त्या कलाकाराचा मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना शुक्रवारी समोर आली.
मनोज धुर्वे (२७, रा. नवरगाव) असे या हौशी कलाकाराचे नाव आहे. गुरुवारी रात्री रामटेकमध्ये शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते. शोभायात्रेतील ट्रॅक्टरवर (एमएच- ४०-एएम-२१६३) शेतकरी आत्महत्येचा देखावा साकारण्यात आला. यात्रेत तिसऱ्या क्रमांकावर हा ट्रॅक्टर होता. देखावा साकारण्यासाठी सहा कलाकारांची निवड करण्यात आली होती. मनोज हा त्यातील एक होता. मूळ कलाकार नसला तरी हौस म्हणून पात्र रंगविण्याची त्याला आवड होती. दरवर्षी शोभायात्रेत त्याचा सक्रिय सहभाग राहत होता. यंदा शेतकरी आत्महत्यांचा गंभीर प्रश्न हाताळण्याची जबाबदारी मनोजवर आली. त्याने तत्काळ होकार भरला. आजवर शेती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून अनुभवले असल्याने हौशी असतानाही आपल्या कलेत जिवंतपणा आणण्याचा प्रयत्न त्याने केला. ट्रॅक्टरवरील देखाव्यात त्याने गळ्यात फास घेतला. दुष्काळी परिस्थिती असल्याने परिसरातील प्रत्येकाचे या देखाव्याने लक्ष वेधले जात होते. हा देखावा आपलीच व्यथा मांडत असल्याचेही काही सांगत होते.
दरम्यान, शोभायात्रा गांधी चौक ओलांडून पुढे जात असताना अचानक ट्रॅक्टरला धक्का बसला आणि मनोज खाली कोसळला. त्याच्या गळ्यातील फास अचानक लागलेल्या या धक्क्याने अधिकच घट्ट बसला. सहकलाकारांच्या लक्षात ही बाब आल्याने सारेच धावून आले. मनोज निपचित पडला. तातडीने रामटेकच्या सरकारी रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी नागपूरच्या मेयो रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, शुक्रवारी पहाटे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रामटेक पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *