ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘नदी वाचवा–जीवन वाचवा’; जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा ‘वसुंधरा’ सन्मान

‘नदी वाचवा–जीवन वाचवा’; जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा ‘वसुंधरा’ सन्मान

– निगडीत 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव

पिंपरी। (PNE)- निगडी, प्राधिकरणातील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ आणि वसुंधरा क्लब पुणे यांच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पर्यावरण विषयक विविध लघुपट, अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य उद्दि्ष्ट ‘नदी वाचवा–जीवन वाचवा’ राहणार आहे. तसेच जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना यंदाचा ‘वसुंधरा’ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाचे कार्याध्यक्ष विनोद बन्सल यांनी दिली.
महोत्सवाचे उद्‌घाटन शनिवारी (दि.11) नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता उपमहापौर शैलजा मोरे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी माजी उपमहापौर व नगरसेवक राजू मिसाळ, अमित गावडे, नगरसेविका शर्मिला बाबर उपस्थित राहणार आहेत. उद्‌घाटनानंतर लगेच पर्यावरण विषयक विविध लघुपट आणि अनुबोधपट प्रदर्शित केले जाणार आहेत.
निसर्ग आणि पर्यावरणक्षेत्राशी संबधित असलेल्या समस्या व आव्हानांचा शोध घेऊन, त्यावर कायमस्वरूपाची उपाययोजना व समाधान शोधून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविणारा हा किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 11 ते 13 नोव्हेंबर दरम्यान पिंपरी-चिंचवडमध्ये संपन्न होणार आहे. यंदाच्या महोत्सवाचे मुख्य सूत्र ‘Save River–Save Life’ म्हणजेच नदी वाचवा–जीवन वाचवा हे आहे.
आपल्या संस्कृतीत नदीला जीवनदायिनी मातेचे स्थान दिलेले आहे. नदीकाठी अनेक संस्कृती रुजल्या व विकसित झाल्या. परंतु आजच्या आधुनिक काळात एकीकडे भौतिक विकास साधत असताना नद्या मात्र लुप्त होत आहेत. अनेक तर मरणासन्न अवस्थेत आहेत. काही ठिकाणी मात्र जागरूक नागरिक आणि शासनाच्या प्रयत्नातून नदीला पुनर्जन्म मिळाल्याची उदाहरणे देखील आहेत. हे आशेचे किरण नदीच उद्याचे भविष्य उज्ज्वल असल्याची ग्वाही देतात. आपले नद्यांशी असलेले नाते अधिक सकारात्मक, आरोग्यदायी, वास्तवदर्शी व शाश्वत असावे यासाठी महोत्सवादरम्यान प्रयत्न करण्यात येणार आहेत.
शनिवारी (दि.11) सकाळी सहा वाजता निसर्ग अभ्यास सहल, एम्प्रेस गार्डन होणार आहे. तज्ज्ञ व्यक्ती मार्गदर्शन करणार असून याचे नियोजन विजय सातपुते यांच्याकडे असणार आहे. त्यानंतर उद्‌घाटन होणार आहे. उद्‌घाटनानंतर लगेच मंडळाच्या कदम सभागृहात पर्यावरण विषयक विविध लघुपट आणि अनुबोधपट प्रदर्शिक केले जाणार आहेत. त्याचे नियोजन मंडळाच्या महिला विभागाकडे आहे. सकाळी 11 वाजता चिंचवड, संभाजीनगर येथील नोव्हेल ज्युनिअर कॉलेजमध्ये गिर्यारोहण प्रात्यक्षिके, उपकरणांची माहिती दिली जाणार आहे. त्याचे प्रमुख कृष्णा ढोकळे असणार आहेत.

दुपारी चार वाजता सावरकर सभागृहात पर्यावरण बाजार (पर्यावरणपूरक वस्तूंचे प्रदर्शन व विक्री)चे उद्‌घाटन होणार आहे. त्याचे प्रमुख राजेश देशमुख असणार आहेत. त्यानंतर कदम सभागृहात निसर्ग विषयक छायाचित्रांच्या प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार आहे. त्यानंतर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपटाचे प्रक्षेपण होणार आहे. सायंकाळी सहा वाजता कदम सभागृहात घरातील ओल्या कच-यापासून बायोगॅस व खत निर्मिती या विषयावर कार्यशाळा होणार आहे. याचे नियोजन विनीत दाते यांच्याकडे असणार आहे.
रविवारी (दि.12) सकाळी आठ वाजता चिंचवड येथील पवना नदी घाटावर भावसर व्हिजनच्या वतीने पवना नदी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. याचे मुख्य अनिल खैरे आहेत. सकाळी दहा वाजता कदम सभागृहात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपट प्रक्षेपण होणार आहे. त्यानंतर दुपारी तीन वाजता सायकल फॉर रिव्हर – “ नदी वाचवा – जीवन वाचवा’ संदेश देणारी सायकल फेरी स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ येथून सुरु होऊन चिंचवड येथील पवना नदी घाटावर शपथ ग्रहण कार्यक्रमानंतर परत सावरकर मंडळात येईल. त्याचे नियोजन श्रीकांत मापारी यांच्याकडे असणार आहे. दुपारी चार वाजता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यावरण विषयक लघुपट प्रक्षेपण होणार आहे.
सोमवारी (दि.13) सकाळी सात वाजता देहूरोड येथील घोरावडेश्वर मंदिरावर निसर्ग सहल जाणार आहे. त्याचे नियोजन सावरकर मंडळ निसर्ग मित्र विभाग करणार आहे. सकाळी दहा वाजता सावरकर सदनातील विविध शाळा, महाविद्यालयांचे विद्यार्थी व विशेष मुले चित्रपट व फोटो प्रदर्शनाला भेट देणार आहेत.

महोत्सवादरम्यान शहरातील 25 पेक्षा जास्त शाळांमधून पर्यावरण प्रबोधन करणारे विषयक लघुपट दाखविले जाणार आहेत. ”नदी वाचवा जीवन वाचवा” या विषयाशी संबधित निबंध स्पर्धा आयोजित केल्या असून दोन हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. या स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ व वसुंधरा सन्मान पुरस्काराचे वितरण सोमवार सायंकाळी साडेसहा वाजता होणार आहे. यावेळी खासदार अमर साबळे, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरचे अध्यक्ष प्रमोद चौधरी उपस्थित राहणार आहेत. जल दिंडीचे प्रणेते डॉ. विश्वास येवले यांना वसुंधरा सन्मान तर व्यंकटेश भताने, सोमनाथ म्हसुडगे देहूगाव यांना वसुंधरा मित्र या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
पर्यावरण बाजारमध्ये पर्यावरणपूरक वस्तू, पारंपारिक उर्जेची उपकरणे इत्यादीचे विक्री व प्रदर्शन आयोजित केले आहे. तसेच याच कालावधीत निसर्ग विषयक छायाचित्रांचे व स्पर्धेतील विजेत्या पोस्टरचे प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. रविवारी (दि.12) रोजी पर्यावरण संतूलन व आरोग्यासाठी सायकल चालवण्याचे फायदे याविषयी प्रचार व प्रसारासाठी आयोजित केलेल्या ‘सायकल फॉर रिव्हर’ या फेरीमधील शहरातील विद्यालयातील व संस्थांचे पाचशेपेक्षा जास्त सायकलस्वार सहभागी होणार आहेत.
सावरकर मंडळातून सुरु होणारी सायकल फेरी चिंचवड येथील पवना नदीवर जाऊन नदी व निसर्गाचे रक्षण करण्याची शपथ घेऊन परत मंडळात येईल. दीपक नलावडे, मनेश म्हस्के, दीपक पंडित, धनंजय शेडबाळे, राजीव भावसार, विनीत दाते, शैलेजा सांगळे, अनुजा वनपाळ आदी कार्यकर्ते यासाठी विवध जबाबदारी पार पाडित आहे. भावसार व्हिजन , गांधीपेठ मित्र मंडळ, चिंचवड , ज्ञानप्रबोधिनी युवक युवती विभाग, इंडो सायकलिस्ट क्लब, सायकल मित्र, पिंपरी-चिंचवड माउंटेनिअरिंग क्लब, वृक्षवल्ली परिवार, पुणे व्हेंचरर्स, फॅमिली फिजीशियन असोसिएशन, दीक्षा फाऊंडेशन, शारीरिक शिक्षक संघ आदी संस्थांचा सहभाग मिळत आहे.
पिंपरी-चिंचवड शहरातील जास्तीत-जास्त नागरिकांनी किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे लाभ घेण्याचे आवाहन, आयोजकांनी केले आहे. यावेळी श्रीकांत मापारी, नरहरी वाघ, राजेश देशमुख, विजय सातपुते, भास्कर रिकामे आदी उपस्थित होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *