ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / महामेट्रोला हवी पालिकेची मोकळी जागा; मेट्रोलगत पाच ठिकाणी होणार पार्किंग!

महामेट्रोला हवी पालिकेची मोकळी जागा; मेट्रोलगत पाच ठिकाणी होणार पार्किंग!

पिंपरी– पीएमपीएमएल बस प्रवासी वाहतूक सेवा सक्षम नसल्यामुळे खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. भविष्यात स्टेशनवरून मेट्रोने प्रवास करण्यासाठी येणाऱ्या प्रवाशांची खासगी वाहने सुरक्षीत ठेवण्यासाठी पुणे महामेट्रो व्यवस्थापनाच्या वतीने पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गालगत पाच ठिकाणी वाहनतळ विकसित करण्यात येणार आहेत. त्यासाठी महामेट्रोने वाहनतळ अथवा अन्य नियोजित प्रकल्पांसाठीच्या आरक्षीत मोकळ्या जागेची मागणी केली आहे. पालिका आणि महामेट्रो दोन्हींच्या संयुक्त सहकार्यातून वाहनतळ विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात अतिशय वेगवान पध्दतीने मेट्रोचे काम सुरू आहे. मात्र, महापालिका व महामेट्रो यांच्यात समन्वय आणि नियोजनाचा अभाव असल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे नागरिकांचे दररोज हाल होताना दिसत आहेत. पिंपरी महापालिका ते खराळवाडी, हाफकिनसमोर ते नाशिक फाट्यापर्यंत मेट्रोचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. काही ठिकाणी पिलर उभारण्यापर्यंत काम पोहोचले आहे. काही दिवसांपासून फुगेवाडी, दापोडी ते सीएमई गेटपर्यंत मेट्रोच्या कामाला सुरूवात झाली आहे. तथापि, नियोजनाच्या अभावी या संपूर्ण पट्ट्यात वाहतुकीच्या तीव्र समस्या निर्माण झाल्या आहेत.

पीएमपीएमएल सार्वजनिक प्रवासी वाहतूक सक्षम नसल्यामुळे शहरात खासगी वाहनांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागत आहे. मेट्रो सुरू झाल्यानंतर बहुतांश प्रवाशांना मेट्रोचा पर्याय राहणार आहे. परंत, मेट्रोने प्रवास करण्यासाठी उपनगरातील नागरिकांना स्टेशनपर्यंत स्वतःच्या वाहनानेच यावे लागणार आहे. त्यांची वाहने लावण्याचा गहन प्रश्‍न भविष्यात निर्माण होणार आहे. पुणे-मुंबई महामार्गालगत वाहने लावल्यास वाहतुक कोंडीत आण्‌खीन भर पडणार आहे. त्याचा मनस्ताप नागरिकांना सहन करण्याची वेळ येणार आहे. त्यासाठी महामेट्रोने पिंपरी ते स्वारगेट मेट्रो मार्गावरील मेट्रोच्या स्टेशन परिसरात वाहनतळ विकसित करण्याचे प्रस्तावित केले आहे. त्यासाठी महामेट्रो व्यवस्थापनाने पिंपरी महापालिकेकडे आरक्षित वाहनतळ अथवा जवळच्या अन्य मोकळ्या जागांची मागणी केली आहे. स्टेशन परिसरातील पालिकेच्या जागेवर सुसज्ज असे वाहनतळ विकसित करण्याचा निर्णय मेट्रेने घेतला आहे.

पालिकेला मिळणार महसूल…
महापालिकेने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या लगत वाहनतळासाठी राखीव असलेल्या आरक्षण क्रमांक 115 व 112 या जागेची मागणी केली आहे. त्याचबरोबर मोरवाडी चौकात फिनोलेक्‍स कंपनीच्या समोर पालिकेची मोकळी जागा आहे. मात्र, तेथे पथारिवाल्यांचे अतिक्रमण आहे. त्याचबरोबर वल्लभनगर आगार येथील वाहनतळाची जागा, कासारवाडी येथील उड्डाणपुलाखालील मोकळ्या जागेचा वाहनतळासाठी उपयोग केला जाणार आहे. फुगेवाडी येथील रेल्वेपूल येथील जागेत वाहनतळ नियोजित आहे. त्यासाठी महापालिकेची मदत घेण्यात येणार आहे. या ठिकाणी वाहनतळ विकसित करून खासगी कंपनीला भाडेतत्वावर चालविण्यास देण्यात येणार आहे. त्याद्वारे पालिकेला आकर्षक महसूलही प्राप्त होणार आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी पालिकेला तसा प्रस्ताव ठेवला आहे. मात्र, पालिकेकडून अद्याप जागेचा ताबा देण्यात आला नाही.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *