ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / योग्य व्यक्तींचा सन्मान होत नाही;विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची खंत

योग्य व्यक्तींचा सन्मान होत नाही;विश्वनाथ प्रसाद तिवारी यांची खंत

पुणे : ‘ज्या समाजात योग्य व्यक्तीचा सन्मान होत नाही, तो समाज गडबडलेला असतो. आपण ज्यांचा सन्मान करायला नको अशांचा करतो आणि ज्यांचा केला पाहिजे त्यांचा करत नाही. ही आपल्याकडील पद्धत आहे,’ या शब्दांत साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी यांनी बुधवारी देशातील पुरस्कार संस्कृतीवर ताशेरे ओढले. ‘ज्या भाषांनी भारताला घडवले, त्यासाठी डॉ. म. अ. मेहेंदळेंनी आपले आयुष्य वेचले. त्यांचा सन्मान हा आमचाच सन्मान आहे,’ असे त्यांनी आवर्जून नमूद केले.
साहित्य अकादमीतर्फे प्राचीन विद्या, भाषा, धर्म व संस्कृती या विषयांचे गाढे अभ्यासक प्रा. डॉ. म. अ. मेहेंदळे यांना तिवारी यांच्या हस्ते ‘साहित्य अकादमी भाषा सन्मान’ प्रदान करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. मनोहर मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमाला अकादमीचे सचिव के. श्रीनिवासराव, मेहेंदळेंचे चिरंजीव कर्नल (निवृत्त) प्रदीप मेहेंदळे, अशोक मेहेंदळे आणि सून रोहिणी मेहेंदळे उपस्थित होते.
‘देशात संस्कृत भाषेसाठी चांगले वातावरण नाही. संस्कृत, पाली या भाषांनी भारताला घडवले असून, अशा भाषांसाठी मेहेंदळेंसारख्या विद्वानांनी योगदान दिले. आपला समाज भाषा आणि साहित्यामुळेच टिकून आहे. आपल्यामुळे भाषा आणि साहित्य टिकलेले नाही,’ याकडे तिवारी यांनी लक्ष वेधले.

 तिवारी म्हणाले, ’साहित्याप्रमाणे समाज असतो. समाज साहित्यातून प्रभावित होतो. साहित्य समाजातून प्रभावित होत नाही. उच्च साहित्यिकार असे साहित्य निर्माण करतात. देशाची संस्कृती, ज्ञान, विज्ञान, आयुर्वेद हे सगळे ज्ञान संस्कृतमध्ये सुरक्षित आहे. संस्कृतमधूल आलेल्या आपल्या ज्ञानाला इंग्रजांनी अशिक्षित ठरवले.’
‘नंदा नारळकरांची आठवण येते.’
‘साहित्य अकादमी हा खूप मोठा सन्मान मिळत आहे, याचा आनंद आहे. आज मला नंदा नारळकर यांची आठवण होते. माझी भाषणे लेख रुपात प्रसिद्ध करण्याचा आग्रह त्यांनी धरला होता. पुढे मे. पुं. रेगे त्यांना भेटायला गेले, तेव्हा वाईच्या प्राज्ञपाठशाळेतर्फे हे लेखन प्रसिद्ध करण्याचे वचन त्यांनी घेतले. त्यांच्यामुळेच ‘प्राचीन भारत : साहित्य आणि संस्कृती’’ हा प्रकल्प पूर्ण झाला,’ अशी भावना शंभरीत पदार्पण केलेल्या डॉ. म. अ. मेहेंदळे यांनी खणखणीत आवाजात व्यक्त केली.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *