ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ साहित्यिक ह. मो. मराठे यांचं पुण्यात निधन

पुणे। आपल्या कथा-कादंबऱ्यांमधून महानगरीय उद्यमशील संस्कृतीचं दर्शन घडवणारे, त्यावर उपरोधिक शैलीत भाष्य करणारे प्रसिद्ध साहित्यिक आणि पत्रकार ह. मो. मराठे यांचं आज पहाटे पुण्यात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असतानाच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दोन वर्षांपूर्वी रंगभूमीवर आलेलं आणि प्रेक्षक-समीक्षकांची दाद मिळवलेलं ‘दोन स्पेशल’ हे नाटक ‘हमों’च्याच ‘न्यूज स्टोरी’ या कथेवर आधारित आहे.

कोकणातील दोडामार्ग तालुक्यातील झोळंबे गावातील एका गरीब कुटुंबात हमोंचा जन्म झाला होता. वडील ‘सिझोफ्रेनिया’सारख्या आजाराने पछाडलेले आणि आईही आजारी. त्यामुळे आर्थिक संकट वाढतच गेलं होतं. अशावेळी हमोंचे वडीलबंधू बाबल यांनी त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली होती. हमोंनीही छोट्या-मोठ्या नोकऱ्या करत त्यांना हातभार लावला होता.

वाचनाच्या गोडीतून ‘हमों’ना लिखाणाचा छंद लागला. ते लघुकथा लिहू लागले. महाविद्यालयात असताना त्यांचे लेख, कथा नामांकित मासिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या होत्या. पण, १९६९ मध्ये ‘निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही लघु कादंबरी ‘साधना’मधून प्रकाशित झाली आणि ते खऱ्या अर्थाने लेखक म्हणून वाचकांसमोर आले. त्यांची ही कादंबरी अनेक विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. त्यानंतर, ‘काळेशार पाणी’ या लघु कादंबरीने साहित्यविश्वात खळबळ उडवली होती.

 

घोडा, न्यूजस्टोरी, युद्ध, ज्वालामुख, टार्गेट या कथा आणि मार्केट, सॉफ्टवेअर या कादंबऱ्यांमधून त्यांनी औद्योगिक क्षेत्रातील मनुष्यजीवनाचं चित्रण केलं. ते वाचकांना भावलं. व्यंग्यात्मक लेखनाची त्यांची १५ ते २० पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

विविध वृत्तपत्रं, नियतकालिकांमध्ये संपादक म्हणून काम करत असताना त्यांनी अनेक प्रयोग केले, तेही यशस्वी ठरले.

वाद, अटक आणि सुटका

पाच वर्षांपूर्वी चिपळूणला झालेल्या ८६व्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी ह. मो. मराठे यांनी अर्ज भरला होता. त्यावेळी एका जुन्या लेखामुळे ते वादाच्या भोवऱ्यात सापडले होते. अध्यक्षपदासाठी प्रचार करताना दोन जातींमध्ये तेढ निर्माण होईल, अशा प्रकारचे लेखन केल्याच्या संभाजी ब्रिगेडच्या आरोपावरून मराठे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यांना अटकही केली होती. त्यानंतर हमोंनी आपली भूमिका स्पष्ट करत अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली होती.

‘माझी एकूण भूमिका ब्राह्मण श्रेष्ठत्वाची किंवा चातुर्वण्याची तरफदारी करण्याची नाहीच नाही, इतर जातींच्या विरोधातही नाही. हजारो जाती, धर्म, पंथ, भाषा, सांस्कृतिक परंपरा असलेल्या संमिश्र भारतीय समाजात जातीजातींत निर्वैर सामंजस्य नांदले पाहिजे, तरच भारतीय समाज एकसंध राहू शकेल अशी माझी भूमिका आहे’, असं निवेदन त्यांनी केलं होतं.

ह. मो. मराठेंची साहित्यसंपदा :

अण्णांची टोपी (कथासंग्रह)
आजची नायिका (उपरोधिक)
इतिवृत्त
इतिहासातील एक अज्ञात दिवस (कथासंग्रह)
उलटा आरसा (उपरोधिक)
एक माणूस एक दिवस (भाग १ ते ३)
कलियुग
काळेशार पाणी : संहिता आणि समीक्षा (वैचारिक)
घोडा
चुनाव रामायण (व्यंगकथा)
ज्वालामुख (कथासंग्रह)
टार्गेट
द बिग बॉस (व्यंगकथा)
दिनमान (उपरोधिक लेख)
देवाची घंटा
न लिहिलेले विषय (वैचारिक)
निष्पर्ण वृक्षावर भर दुपारी (१९७२)
न्यूज स्टोरी
पहिला चहा (भाग १, २). : दैनिक पुढारीमधून प्रसिद्ध झालेल्या लेखांचा संग्रह.
पोहरा (आत्मकथा; ’बालकांड’चा २रा भाग)
प्रास्ताविक
बालकांड (आत्मकथेचा १ला भाग; दुसरा भाग – पोहरा)
बालकाण्ड आणि पोहरा : समीक्षा आणि समांतर समीक्षा (संपादक आणि प्रकाशक – ह.मो. मराठे)
मधलं पान (लेखसंग्रह)
मार्केट (१९८६)
मुंबईचे उंदीर (व्यंगकथा)
माधुरीच्या दारातील घोडा (व्यंगकथा)
युद्ध
लावा (हिंदी)
वीज (बाल साहित्य)
श्रीमंत श्यामची आई (व्यंगकथा)
सॉफ्टवेअर
स्वर्गसुखाचे package (विनोदी)
हद्दपार
ह.मो. मराठे यांच्या निवडक कथा (कथासंग्रह)
पुस्तिका संपादन करा
आधी रोखल्या बंदुका आता उगारल्या तलवारी
गंध, शेंडी, जानवे आणि ब्राह्मण चळवळ
ब्राह्मण चळवळ कशासाठी?
ब्राह्मणनिंदेची नवी लाट
ब्राह्मणमानस
ब्राह्मणांना आणखी किती झोडपणार? (२००४)
विद्रोही ब्राह्मण
…. शिवधर्म…
संत तुकारामांचा खून खरोखरीच ब्राह्मणांनी केला असेल का?

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *