ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / केंद्राने मंदीत नोटाबंदी करून आगीत तेल ओतले: यशवंत सिन्हा

केंद्राने मंदीत नोटाबंदी करून आगीत तेल ओतले: यशवंत सिन्हा

नवी दिल्ली: नोटाबंदीच्या मुद्द्यावरून भाजप नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘आपण गरिबी अत्यंत जवळून पाहिल्याचा दावा पंतप्रधान करत आहेत. पण मोदींचे अर्थमंत्री ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्यावरून देशातील जनतेला लवकरच जवळून गरिबी पहावी लागेल असं चित्रं आहे’, असा टोला लगावतानाच मंदीत नोटाबंदी करून या सरकारने आगीत तेल ओतल्याची खरपूस टीकाही यशवंत सिन्हा यांनी मोदी सरकारवर केली. सिन्हा यांनी दिलेल्या या घरच्या अहेरामुळे भाजपमध्ये एकच खळबळ माजली आहे.
यशवंत सिन्हा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्रासाठी लिहिलेल्या लेखात मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांचा पंचनामाच केला. मंदीचा काळ सुरू असताना नोटाबंदी करून मोदी सरकारने आगीत तेल ओतल्याची टीका सिन्हा यांनी केली आहे. पंतप्रधान दावा करतात की, त्यांनी गरिबी अत्यंत जवळून पाहिली आहे. त्याचवेळी, देशातील प्रत्येक नागरिकाने गरिबी जवळून पाहावी, यासाठी त्यांचेच अर्थमंत्री दिवस-रात्र मेहनत करत आहेत, अशी जळजळीत टीका सिन्हा यांनी अरुण जेटलींवर केली. अर्थमंत्र्यांनी अर्थव्यवस्थेची जी अवस्था करुन ठेवलीय, त्यावर आता बोललो नाही, तर ते माझ्या देशाप्रती असलेल्या कर्तव्याशी धोका केल्यासारखं होईल. मला माहिती आहे, मी जे बोलतोय त्याच्याशी भाजपचे अनेक लोक सहमत होतील. मात्र भीतीमुळे ते बोलत नाहीत, असेही यशवंत सिन्हा यांनी म्हटलं आहे.

जीएसटीमुळे भयावह स्थिती

खासगी गुंतवणुकीत जितकी घसरण झालीय, तितकी गेल्या दोन दशकात झाली नाही. औद्योगिक उत्पन्नाची स्थिती बिकट आहे, कृषी क्षेत्रातही समस्या वाढल्यात. रोजगार उपलब्ध करणारे उद्योगधंदेही संकटात आहेत. नोटाबंदी पूर्णपणे अयशस्वी झाली आहे. त्याचवेळी, जीएसटी लागू केल्याने व्यापाऱ्यांमध्ये भयावह स्थिती आहे. लाखो लोक बेरोजगार होत आहे, असं सिन्हा यांनी या लेखात नमूद केलं आहे.
विकास दरातील होत असलेल्या घसरणीवरूनही सिन्हा यांनी जेटली यांच्यावर निशाना साधला आहे. पहिल्या तिमाहीत विकास दर घसरुन ५.७ टक्के झाला. गेल्या तीन वर्षातील ही सर्वात मोठी घसरण आहे. त्यात सरकारचे प्रवक्ते म्हणतात, नोटाबंदीमुळे मंदी आली नाही. त्यांचं बरोबर आहे. कारण मंदीची सुरुवात आधीच झाली होती. नोटाबंदीने केवळ आगीत तेल ओतण्याचं काम केलंआहे, असेही सिन्हा यांनी म्हटलं आहे.
इक्यात अर्थव्यवस्था रूळावर येण्याची खात्री नाही
कोणतीही अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी वेळ लागतो. पण अर्थव्यवस्था डबघाईला आणण्यासाठी काहीच वेळ लागत नाही. ९० च्या दशकात आणि २००० सालात अर्थव्यवस्था रूळावर आणण्यासाठी चार वर्ष लागली होती. कोणाकडेही जादूची कांडी नाही. कोणीही रातोरात अर्थव्यवस्था रूळावर आणू शकत नाही, असं सांगतानाच पुढच्या लोकसभा निवडणुकीपर्यंत अर्थव्यवस्था रूळावर येईल याची खात्री देता येत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *