ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / भविष्यात भारत हिंदूराष्ट्र होणारच- खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

भविष्यात भारत हिंदूराष्ट्र होणारच- खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी

नगर : ‘राष्ट्रीय अस्मिता समजून घेण्यासाठी प्रत्येकाने भारतीय राज्य घटना अभ्यासली पाहिजे. हिंदू संस्कृतीशी निगडीत तरतुदी घटनेत आहेत. त्यामुळे घटना पूर्ण समजून घेऊन तिची अंमलबजावणी केली तर भारत देश नक्कीच एक दिवस हिंदू राष्ट्र होईल’, असा ठाम विश्वास ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ खासदार डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी मंगळवारी सायंकाळी येथे व्यक्त केला. ‘अयोध्येत श्रीराम मंदिर, काशीमध्ये विश्वनाथ मंदिर व मथुरेत श्रीकृष्ण मंदिर होणारच आहेत’, असाही दावा त्यांनी केला.
नगरमधील पंडित दीनदयाळ नागरी सहकारी पतसंस्थेने आयोजित केलेल्या पंडित दीनदयाळ व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी यांनी गुंफले. ‘राष्ट्रीय अस्मिता व एकात्मता मानवतावाद’ या विषयावर बोलताना डॉ. स्वामींनी देशासमोरील सध्याच्या विविध प्रश्नांचा तसेच भाजप सरकारवर विविध माध्यमांतून होणाऱ्या टीकेचा जोरदार समाचार घेतला. ‘१९४७मध्ये ब्रिटीशांनी संसदेत आणलेल्या इंडियन इंडिपेंडन्स अॅक्टनुसार एक मुस्लिम व एक हिंदू राष्ट्र ठरवले होते. पण काँग्रेसने त्याला नकार देताना भारताला ‘सेक्युलर’ राष्ट्र बनवणार असल्याचे सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लोकसंख्या एक्सेंजची मागणी केली. पण त्यालाही तयारी दाखवली गेली नाही. राज्य घटनेत कोठेही ‘सेक्युलर’ शब्द नाही. १९७६मध्ये आणीबाणीच्या वेळी हा शब्द त्यात घातला गेला. राष्ट्रीय अस्मिता समजून घेण्याआधी भारतीय राज्य घटना अभ्यासणे आवश्यक आहे. यातील सर्व तरतुदी हिंदू संस्कृतीशी निगडित आहेत. गोहत्या बंदी, नशा बंदीसह पूजा अधिकार मूलभूत मानला आहे. मात्र, कोणतीही पूजा नैतिकतेविरुद्ध असेल, सार्वजनिक व्यवस्थेला उपद्रव करणारी असेल वा समाजस्वास्थ्य बिघडवणारी असेल तर त्यावर अंकुश ठेवण्याचा अधिकारही घटनेने सरकारला दिला आहे. शरीयत व बायबलवरही असे निर्बंध आहेत.
‘देशातील ४० हजार मंदिरे तोडून तेथे मशिदी केल्या आहेत. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बैठकीत केवळ अयोध्येचे श्रीराम मंदिर, काशीचे विश्वनाथ मंदिर व मथुरेचे कृष्ण मंदिर ही तीन मंदिरे करण्याचे निश्चित झाले आहे. अयोध्येत श्रीराम मंदिर होणार यात कोणताही संदेह नाही.’ ‘उत्तर प्रदेशातील १२५ विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ मुस्लिम महिलांनी मतदान केल्याने भाजपचे ८५ आमदार निवडून आले आहेत. तिहेरी तलाक रद्द करण्याची भूमिका सरकारने घेतल्याने या महिलांनी भाजपला मते दिली आहेत व आता शिया पंथियही सरकारच्या जवळ येत आहेत. रामजन्मभूमीवर राम मंदिर व्हावे, अशी इच्छा व्यक्त करताना मशिदीसाठी त्यांनी दुसरीकडे जागा देण्याची मागणी केली आहे. शैक्षणिक इतिहासात अकबर ते औरंगजेबापर्यंत दीडशेवर प्रकरणे आहेत, पण छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई, महाराणा प्रताप, झांशीची राणी लक्ष्मीबाई, विजयनगरचा संघर्ष यावर प्रकरणे नाहीत. त्यामुळे आता शालेय पुस्तकांतील इतिहासही वास्तविकेवर आधारित लिहिला जाणार आहे. दीनदयाळ पतसंस्थेचे अध्यक्ष वसंत लोढा यांनी स्वागत केले. उद्योजक नरेंद्र फिरोदिया, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड, डॉ. रवींद्र साताळकर, विकास पाथरकर, गौतम दीक्षित, दीपा चंदे, धनंजय तागडे, सुहास मुळे, नरेंद्र श्रोत्री आदींसह अन्य उपस्थित होते.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *