ताज़ा खबरे
Home / ताज़ा खबरे / ‘बैलगाडा शर्यत’ विधेयकाची राजपत्रात नोंद!

‘बैलगाडा शर्यत’ विधेयकाची राजपत्रात नोंद!

  • पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांची माहिती
  • विधेयकाची प्रत्र आमदार लांडगे यांच्याकडे सुपूर्द
पिंपरी – राज्यातील तमाम बैलगाडा मालकांच्या जिव्‍हाळ्याचा विषय असलेल्या बैलगाडा शर्यतीसंदर्भातील विधेयकाची महाराष्ट्र राज्य शासनाच्या राजपत्रात नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे, बैलगाडा मालक आणि प्रेमींचे सर्वमान्य नेतृत्त्व म्हणून ती प्रत पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी आमदार महेश लांडगे यांच्याकडे मंगळवारी सुपूर्त केली.
तमीळनाडू येथील जलीकट्टु स्पर्धेच्या धर्तीवर राज्यात बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठविण्यात यावी, अशी मागणी करीत आमदार लांडगे यांनी गेल्या चार वर्षांपासून राज्य आणि केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू केला होता. राज्यातील बैलगाडा मालक आणि शर्यतप्रेमींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री गिरीष बापट यांच्यासह भाजपच्या दिल्लीतील नेत्यांकडे सांकडे घातले होते. अखेर दि.२२ जुलै रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी बैलगाडा शर्यतीसंदर्भातील विधेयकावर स्वाक्षरी केली. त्यामुळे बैलगाडा शर्यतींचा मार्ग मोकळा झाला.
दरम्यान, केंद्र सरकारच्या गृहविभागाने संबंधित विधेयक राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे पाठवले. त्यानंतर राज्यपालांनी संबंधित विधेयक राज्य सरकारकडे सुपूर्द केले. तसेच, राज्याच्या राजपत्रात दि. ३१ जुलै रोजी संबंधित विधेयकाची नोंद करण्यात आली. राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी मंगळवारी विधानभवन येथे आमदार महेश लांडगे यांच्याकडे बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबतच्या विधेयकाची प्रत्र सुपूर्द केली.
पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर म्हणाले की, बैलगाडा शर्यतीबाबत भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे व अखिल भारतीय बैलगाडा शर्यत संघटना मागील काही वर्षांपासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते. प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960 मध्ये सुधारणा करत बैलगाडा शर्यतीला मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील शेतक-यांच्या जिव्‍हाळ्याची बैलगाडा शर्यत आता पुन्हा सुरु होणार आहे.
————-
भाजप सरकारचे आभार – आमदार लांडगे 
महाराष्ट्र राज्यात जिल्हाधिका-यांच्या परवानगीने बैलगाडा शर्यती आयोजित करता येणार आहेत. महाराष्ट्र शासनाच्या पशूसंवर्धन विभागाकडून अधिसूचना काढून नियम आणि अटी प्रसिद्ध करण्यात येतील. सांस्कृतिक परंपरांना सुरु ठेवणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे.  बैलगाडा शर्यती सुरु झाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व पारंपरिक प्रथांचे रक्षण होणार आहे. तसेच, बैलांच्या मूळ प्रजातींचे संवर्धन होणार आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठविल्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम शेतकरी आणि बैलगाडा शर्यतप्रेमींच्या वतीने मी भाजप सरकारचे आभार मानतो, अशा भावना यावेळी आमदार महेश लांडगे यांनी व्यक्त केल्या.

Check Also

संजोग वाघेरे के नामांकन पर्चा दाखिल रैली में उमड़ा जनसैलाब

आदित्य ठाकरे,अमोल कोल्हे,सचिन अहिर,माणिक ठाकरे रहे उपस्थित पिंपरी- मावल लोकसभा क्षेत्र से शिवसेना उद्धव ठाकरे-राकांपा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *